Sunday, 17 October 2021

सार्थ श्रीदेवीस्तोत्रे : शक्ती उपासनेसाठीचे मौलिक पुस्तक_आस्वादक भक्त: नागेश सू. शेवाळकर, पुणे.

 

सार्थ श्रीदेवीस्तोत्रे : शक्ती उपासनेसाठीचे मौलिक पुस्तक!

  आस्वादक भक्त: नागेश सू. शेवाळकर, पुणे.

शक्ती उपासनेची एक समृद्ध परंपरा भारतवर्षाला लाभलेली आहे. अगदी प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातही श्रीदेवीच्या नितांत सुंदर स्तोत्रांची रचना आपल्याला आढळते. मराठवाडा ही संतांची भूमी असे अभिमानाने सांगितले जाते. या संत परंपरेतील थोर संत म्हणून ज्यांची ओळख आहे असे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील श्रीगुरु भगवानशास्त्री महाराज! या थोर संताचा वारसा अत्यंत समर्थपणे पुढे चालविणारे  सुप्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर! शास्त्री यांच्या घराण्याला श्रीदेवीभक्तीची थोर परंपरा लाभली आहे, जणू देवीमातेचा वरदहस्त लाभला आहे!

          नुकतेच ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्रीजींनी संकलित आणि अनुवादित केलेले 'श्रीदेवीस्तोत्रे' हे भक्तीरसाने ओथंबलेले पुस्तक वाचण्यात आले. संस्कृत भाषेतील या स्तोत्रांचा मराठी अर्थासह अनुवाद केलेल्या या पुस्तकाचा नित्यपाठासाठी माउलीच्या भक्तांना उपयोग होईल असा हा ग्रंथ आहे.  श्रीदेवीस्तोत्रे हे पुस्तक नवरात्री उत्सवाच्या मंगल समयी शॉपिज़न प्रकाशन, अहमदाबाद, गुजरात यांचे द्वारे प्रकाशित झाले आहे. मुखपृष्ठ अत्यंत बोलके आणि भक्तीरसाने परिपूर्ण असे आहे. श्रीरेणुकामातेचे प्रसन्न मुख आणि त्याखाली अत्यंत भावपूर्ण आणि तितकीच प्रसन्न अशी लेखक डॉ. चंद्रहास यांची भक्तीमय मुद्रा! मलपृष्ठावर श्रीमत् आद्य शंकराचार्य, संत श्री रंगनाथमहाराज आणि संत श्री भगवानशास्त्री महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करणारी लेखक सोनपेठकर यांची भावमुद्रा लक्षणीय आहे.

आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून  स्तोत्र साहित्य गंगा प्रवाहित आहे. अनेक पुराणांमध्ये सुद्धा विविध देवतांची विविध स्तोत्रे आपल्याला दिसून येतात. तसेच भारतीय संस्कृतीत शक्ती आराधनेची सुद्धा एक जाज्वल्य अशी परंपरा दिसून येते. “कलौ चण्डीविनायकौ |” अशा शब्दांत कलियुगात भगवान गणेश आणि भगवतीच्या उपासनेचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. वेदांमध्ये,  मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी अनेक पुराणांत, अनेक तंत्र वाङ्मयात, आद्य शंकराचार्यादि महान विभूतींच्या रचनांमध्ये स्तोत्र वाङ्मयाची प्रगल्भ परंपरा आपल्याला दिसून येते. मराठी साहित्यात देखील अनेक सुंदर स्तोत्रे आहेत. 

ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर हे प्रवचनकार, संस्कृत कवी, कीर्तनकार, भागवतकार म्हणून प्रसिद्ध आहेतच, पण विशेष म्हणजे त्यांच्या घराण्याला जगदंबेच्या भक्तीची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. थोर शाक्त पंथी साधू श्री योगानंद स्वामी महाराज, संत श्री भगवानशास्त्री महाराज यांच्या रूपात श्रीदेवीभक्तीची महान परंपरा त्यांना लाभली आहे. डॉ. चंद्रहास शास्त्री यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि त्यांच्या पत्नी संस्कृत शिक्षिका तसेच अभिज्ञान, पुणे या संस्थेच्या संचालिका सौ. मानसी चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांच्या सहलेखनाने प्रस्तुत पुस्तक सिद्ध झाले आहे. 

नित्य पाठासाठी सार्थ श्रीदेवीस्तोत्रे या पुस्तकाची काही महत्वाची अशी वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील.

१. स्तोत्रांची निवड: 

या पुस्तकात श्रीमदाद्यशंकराचार्य विरचित श्रीदेवीच्या पाच स्तोत्रांचा समावेश करण्यात आला आहे. श्रीदेव्यपराधक्षमापनस्तोत्रम्, श्रीकनकधारास्तोत्रम्, श्रीभवान्यष्टकम्, श्रीललितापञ्चकम् आणि श्रीमनीषापञ्चकम् या स्तोत्रांचा समावेश या पुस्तकात आहे. ही पाचही स्तोत्रे नितांत सुंदर आहेत. भक्तीरसाने ओतप्रोत अशी आहेत. ही स्तोत्रे म्हणण्यासाठी सोपी आहेत. आशयघन आहेत. 

२. सार्थ स्तोत्रे: 

 या पुस्तकात स्तोत्रांची अचूक अशी संस्कृत संहिता तर आहेच, त्याच बरोबर स्तोत्रांचा मराठी अर्थ सुद्धा समर्पकपणे या पुस्तकात दिलेला आहे. त्यामुळे ह्या स्तोत्रांचा भावार्थ वाचकांना, भक्तांना समजून घ्यायला खूप सोपे झाले आहे. त्यासाठी डॉ. चंद्रहास शास्त्री यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.

३. आकर्षक मांडणी: 

पुस्तकातील स्तोत्रांची मांडणी सुव्यवस्थित अशी आहे. स्तोत्र म्हणताना ते अखंड म्हणता यावे, म्हणून आधी संपूर्ण संस्कृत स्तोत्र दिले आहे. आणि नंतर स्तोत्राचा अर्थ देखील मराठीत अखंड दिला आहे. 

४. चंद्रहास शास्त्री विरचित स्तोत्र:

     या पुस्तकात डॉ. चंद्रहास शास्त्री विरचित श्रीदुर्गादेवीचे १०८ श्लोकांचे संस्कृत स्तोत्र सुद्धा देण्यात आले आहे. प्रस्तुत स्तोत्र ही कवीने अंबाबाईच्या चरणाशी केलेली आर्त अशी प्रार्थना आहे. भक्तीरसप्रधान असे हे स्तोत्र वाचकांना एक गोष्ट नक्की सांगून जाते की, आजच्या काळात देखील सुंदर अशा संस्कृत रचना केल्या जातात. संस्कृत ही जिवंत भाषा आहे. अमर वाणी आहे, अशी साक्षच जणू या आशयघन स्तोत्राने मिळते.   

५. विशेष लेख : 

विसाव्या शतकातील एक महान संत वारकरी परंपरा आणि शक्ती उपासनेची परंपरा यांचा समन्वय ज्यांच्या ठायी दिसून येतो, असे श्रीगुरू भगवानशास्त्री महाराज सोनपेठकर यांचे अल्पचरित्र सांगणारा, सौ. मानसी चंद्रहास शास्त्री यांचा एक विशेष लेख या पुस्तकात आहे. या लेखातून श्री भगवानशास्त्री यांच्या अलौकिक कार्याची ओळख वाचकांना होते. तसेच डॉ. चंद्रहास शास्त्री यांच्या विविधांगी कार्याचा आढावा घेणारा 'अमृताची फळे अमृताची वेली' प्रा. विराज आडे यांचा हा विशेष लेख  या पुस्तकात आहे. यामुळे या पुस्तकाचे महत्व देखील विशेष असे झाले आहे, असे म्हणावेसे वाटते. 

       डॉ. चंद्रहास शास्त्री यांच्या सिद्धहस्त लेखणीतून यापूर्वी नारदभक्तीसूत्र, values in Raghuvansham, Essays on Education, भगवती रंगचंद्र गाथा, श्रीरेणुकाशरणम्ः अशी विविध प्रकारची पुस्तके प्रसवली आहेत. मुळात शास्त्रीजींचा स्वर हा मधाळ, प्रेमळ असा आहे. हाच भाव त्यांच्या लेखणीतूनही उतरला आहे त्यामुळे वाचकांचा भक्तीभाव अधिक दृढ होतो. 

    असे हे भक्तीपूर्ण अंतःकरणाने लिहिलेले पुस्तक शॉपिज़न या संस्थेच्या वेबसाईटवर सशुल्क उपलब्ध आहे.

एकंदरच, श्रीदेवीच्या उपासनेत मान्यता असणारी अशी स्तोत्रे या पुस्तकात अर्थासह दिली आहेत. श्रीदेव्यपराधक्षमापनस्तोत्रम्, श्रीकनकधारास्तोत्रम्, श्रीभवान्यष्टकम्, श्रीललितापञ्चकम् आणि श्रीमनीषापञ्चकम् या स्तोत्रांचा समावेश या पुस्तकात आहे. भुक्तिमुक्ति प्रदायिनी अशा भगवतीच्या नितांत सुंदर स्तोत्रांचा समावेश असणारा हा स्तोत्र संग्रह नक्कीच संग्रहणीय आहे. 

                                 ००००

नित्यपाठासाठी सार्थ श्रीदेवीस्तोत्रे, 

संकलन व अनुवाद: ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर,पुणे.

             (७२४९१२२४२८)

सहलेखन: सौ. मानसी चंद्रहास शास्त्री सोनपेठकर,

शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद (कर्णावती), गुजरात 

मूल्य: १५०/- रु.

आस्वादक भक्त: नागेश सू. शेवाळकर, पुणे.

                (९४२३१३९०७१)

Saturday, 4 July 2020

ऐसियांचा संग देई नारायणा

*भक्तराज, श्री सिद्धिविनायक एज्युकेशन्सचे संचालक प्रा. श्री. विराज आडे यांचा  डॉ.चंद्रहासशास्त्रींविषयीचा लेख......*

*ऐसियांचा संग देई नारायणा।*
*लेखक: प्रा. विराज आडे,*

*अमृताची फळे अमृताची वेली । ते चि पूढे चाली बीजाची ही || या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे, विसाव्या शतकातील थोर संत वै. श्रीगुरू भगवानशास्त्री महाराज सोनपेठकर यांचा वारसा ह.भ.प. डॉ. चंद्रहासशास्त्री महाराज सोनपेठकर  हे  समर्थपणे चालवीत आहेत. आज गुरुपौर्णिमेनिमित्त हा विशेष लेख.*

शास्त्रीजींचे पूर्ण नाव डॉ. चंद्रहास दुर्गादासशास्त्री सोनपेठकर असे आहे. शास्त्रीजींचे लौकिक शिक्षण एम. ए. संस्कृत (स्वा.रा.ती.म.विद्यापीठ सर्वप्रथम), एम.एड. सेट संस्कृत, सेट व नेट शिक्षणशास्त्र, पीएच. डी. (उपनिषद) असे झालेले आहे. 
डॉ. शास्त्रीजींच्या सांप्रदायिक शिक्षणाचा शुभारंभ वै. श्रीगुरू भगवानशास्त्री महाराज सोनपेठकर यांचेकडे झाला. वयाच्या चौथ्या वर्षी चंद्रहास शास्त्रींनी संत श्री ज्ञानेश्वर माऊली जन्मस्थान, आपेगाव येथे पहिले प्रवचन केले. हे प्रवचन वै. ह.भ.प. श्री. विष्णूमहाराज कोल्हापूरकर गुरुजी यांनी आयोजित केले होते. आपेगाव येथे वै. कोल्हापूरकर गुरुजींनी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहात दररोज प्रात:स्मरणीय श्रीगुरुंचे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या गाथेवर चिंतन संपन्न होत असे. एक दिवस आदरणीय कोल्हापूरकर गुरुजी श्रीगुरुंना म्हणाले की, आज आपल्या आधी थोडा वेळ आपल्या नातवाचे चंद्रहासचे प्रवचन आयोजित करू या, श्रीगुरुंनी या प्रस्तावाला आनंदाने संमती दिली. चंद्रहासला आशीर्वाद दिले. दुपारच्या चारच्या सत्रात हे प्रवचन होते. आदरणीय कोल्हापूरकर गुरुजींचे शिष्य ह.भ.प. उत्तम महाराज यांनी चंद्रहासला खांद्यावर घेऊन माऊलींच्या सभा मंडपात नेले. आणि तिथून हा प्रवास सुरु झाला. ही आठवण सांगतांना आजही शास्त्रीजींना गहिवरून येते. पुढे माघ दशमी, इ.स. १९८७ साली प्रात:स्मरणीय श्रीगुरुंनी चंद्रहासला तुळशी माळ घातली. प्रात:स्मरणीय श्रीगुरूंचा शिष्य परिवार खूप मोठा आहे. मात्र त्यात श्रीगुरूंचा अंतिम शिष्य म्हणजे चंद्रहास शास्त्री. माघ व. नवमीचे दिवशी श्रीगुरु ब्रह्मलीन झाले. या नंतर ह.भ.प. श्री रेणुकादास महाराज यांच्याकडे चंद्रहास शास्त्रींचे आध्यात्मिक शिक्षण संपन्न झाले. 
संस्कृत अध्ययनातील प्रावीण्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनाने सन्मान केलेला आहे. तसेच परभणीचे माननीय आमदार डॉ. राहुल पाटील यांनी त्यांना परभणी रत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे. 
डॉ. शास्त्रीजी हे एक सिद्धहस्त लेखक आहेत. त्यांची अनेक पुस्तके, लेख इत्यादी प्रसिद्ध आहे. समाज माध्यमांवरही ते क्रियाशील असतात. शास्त्रीजींच्या काही पुस्तकांचा परिचय पुढीलप्रमाणे:
१. नारदभक्तीसूत्र: 
संस्कृत सूत्र आणि मराठी अर्थ असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
२. Values in Raghuvansham:
संस्कृत महाकवी कालिदासाच्या रघुवंशातील जीवनमूल्यांचा आढावा घेणारे असे हे संशोधनात्मक पुस्तक आहे.
३. Essays on Education:
या पुस्तकाचे सहलेखन शास्त्रीजींनी केले आहे. यात शिक्षणव्यवस्थेवरील विविध लेख आहेत.
४. भगवती रंगचंद्र गाथा:
या पुस्तकात माहूरगडनिवासिनी जगदंबा रेणुकामातेवरील भक्तिपूर्ण रचना आहेत. विशेष म्हणजे या रचना स्वत: डॉ. शास्त्रीजींच्या आहेत. 
या शिवाय एम एड. परिपूर्ण अभ्यास, बी.एड. परिपूर्ण अभ्यास इत्यादी पुस्तकांचे लेखन/संपादन शास्त्रीजींनी केले आहे. 
आकाशवाणी, दूरचित्रवाहिनी इ. माध्यमातूनही शास्त्रीजींचे कार्यक्रम संपन्न होत असतात. 
तसेच व्याख्यान, प्रवचन, कीर्तन, भागवत आदि कार्यक्रमांसाठी शास्त्रीजींची भ्रमंती सतत सुरूच असते. 
भगवद्भक्ती हा शास्त्रीजींचा स्थायीभाव आहे. रसाळ वाणीचे वरदान त्यांना लाभलेले आहे. व्यासंग, निरंतर वाचन-लेखन हा त्यांचा नित्यक्रम आहे. सात्विक आचरण, सतत नामस्मरण यात ते रत असतात. ज्योतिष शास्त्राचाही त्यांचा अभ्यास आहे.  
शास्त्रीजी वर्गात असोत किंवा व्यासपीठावर, अध्यापनाचा विषय कितीही अवघड असला, तरी तो सोपा करून सांगण्याची त्यांची हातोटी आहे. 
*वै. श्रीगुरू संत श्री. भगवानशास्त्री महाराज आणि  ब्र. भू. संत श्री रंगनाथ महाराज गुरुजी यांचेवर डॉ. शास्त्रीजींची अतीव निष्ठा आहे.* या दोन विभूतींच्या स्मरणार्थ त्यांनी *वारकरी संत विचार परिक्रमा* सुरू केलेली आहे. सकारात्मकता हे डॉ. शास्त्रीजींच्या कार्यशैलीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. वारकरी संत विचार परिक्रमा यात्रे निमित्त ते प्रवास करीत होते. आणि lock down सुरु झाले. तेव्हा त्यांनी हार न मानता परिक्रमेचे कार्य फेसबुक पेजच्या माध्यमातून सुरु ठेवले. शास्त्रीजींच्या या उपक्रमांमध्ये त्यांच्या सहधर्मचारिणी सौ. मानसी वहिनींचे देखील सहकार्य असते. 
संस्कृतच्या क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर शास्त्रीजींचा भर असतो. 
*अहंकाराचा वारा न लागो राजसा।*
या प्रमाणे त्यांचे वागणे असते. विनम्रता, मधुर संभाषण, माणसे जोडण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. या बळावरच त्यांचे अध्यात्मिक कार्य सुरु आहे. *त्यांच्या बहुतेक कार्यात आम्हा मित्रमंडळींचा फूल न फुलाची पाकळी असा सहभाग असतो. यातून आम्हाला जे समाधान मिळते, ते अवर्णनीय आहे.* 
आम्ही जेव्हा जेव्हा शास्त्रीजींना वाढदिवस साजरा करण्याची कल्पना मांडतो, ते विनम्र नकार देतात. गेल्या वर्षी पुण्यातील एक नामवंत चपराक प्रकाशन यांनी शास्त्रीजींची मुलाखत त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित केली. ती मुलाखत संस्कृत भाषेच्या प्रचाराबाबत होती. अन्यथा स्वत:चा मोठेपणा, प्रशंसा हे शास्त्रीजींच्या आवडीचे विषय नाहीत. पण शास्त्रीजींचे कार्य हे लोकोपयोगी कार्य आहे. ते सर्वांसमोर यावे, म्हणून हा लेख समाज माध्यमांत प्रकाशित करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. 

शास्त्रीजींच्या आध्यात्मिक कार्याला अनेक अनेक शुभेच्छा!
माऊली की जय! जय श्रीकृष्ण!!!
संदर्भ:
डॉ. चांदजकर, चंद्रहासशास्त्रींचे व्यक्तिमत्व
articlesaboutdrchandrahas.blogspot.com
V. S. Phatangare, A Study of Dr. Chandrhas Sonpethkar's posts related to Sanskrit literature in social media 

लेखक:
*प्रा. विराज आडे,*
संचालक,
श्री सिद्धिविनायक एज्युकेशन्स,
नांदेड

(लेखकाच्या नावासह आपण हा लेख शेअर करू शकता. )
 

Tuesday, 30 August 2016

Senior Educationist, Prof. Dr. Smita Phatak writes about Dr. Sonpethkar's presentation regarding Sanskrit Interest Enhancement @ NCERT, Delhi on 17th Aug, 2016

 
Sir,
 I read your paper in detail and was very impressed.
No wonder experts at NCERT appreciated it.
The research study topic selected was very good  as we and you as teachers of Sanskrit need to develop and enhance the love for the language and revive it so that it gets back its glory
Very clearly and properly written it made interesting reading.
Best of luck for future such endeavors
Regards